उपवास म्हणजे बटाटा, रताळे, साबुदाणा, वरई (भगर), कोणी लाल भोपळा, भेंडी सुद्धा नवरात्री मध्ये खातात. या शिवाय तुम्ही राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिऱ्याची भाजी, राजगिरा पीठाची भाकरी नक्की खाल्ली असणार. तुम्हाला माहिती आहे का 'सुपर फुड' म्हणून जागतिक दर्जा घोषित झाला आहे राजगिऱ्याला. त्याचे पौष्टिक गुणधर्म काय हे तर पहायलाच हवेत नाही का ? तर चला आपण जाणून घेऊ या 'सुपर फुड' राजगिऱ्याबद्दल.


राजगिरा ही वनस्पती अमेरिकेतून प्रवास करत भारतात आली आणि आपली स्वयंपाक घरात उपवासासाठी पदार्थांमध्ये स्थान पटकावले. राजगिऱ्यास रामदाना, ॲमरँथस म्हणुनही ओळखले जाते. महाराष्ट्रात ती सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते, तिला ‘श्रावणी माठ' या नावाने सुद्धा ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये व बीड जिल्ह्यामध्ये याची भरपूर प्रमाणात लागवड करतात. माठ, तांदूळजा व राजगिरा या वनस्पती एकाच वर्गात मोडतात.


ॲमरँथस / रामदाना :-

ॲमरँथस वनस्पतीची फुले आकर्षक आणि शोभिवंत असतात. उत्तर भारतात या प्रजातीतील ॲ. कॉडॅटस जातीची लागवड करतात. तिच्या बियांचा उपयोग राजगिऱ्या सारखा केला जातो, तिथे तिला रामदाना या नावाने ओळखली जाते. तिची पाने गोलसर टोकांची असून कणीसं लोंबणारी असतात.


पौष्टिक तत्त्व :- 

राजगिरा पिकामध्ये 14 ते 16 टक्के प्रथिने, लायसिन हे अत्यावश्यक अमिनो ऍसिड व लिनोलिक ॲसिड हे फॅटी ॲसिड उपलब्ध असते. बीटा कॅरोटिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाणसुद्धा चांगले आहे.


अमिनो ॲसिड :- 

एजिंग रोखण्यास उपयुक्त असं लायसिन नावाचं महत्त्वाचं अमिनो ॲसिड राजगिरा या पालेभाजीत असतं. 


लिनोलिक ॲसिड :- 

लिनोलिक ॲसिड हे फॅटी ॲसिड आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे वेळे-अगोदर म्हातारपण दिसु लागतं. त्यावेळी आपण केमिकल युक्त असे बाजारातुन क्रीम आणुन चेहऱ्यावर लावतो. पण हे झाले बाह्य उपचार. पण जर तुम्ही आठवड्यातून एकदा राजगिरा भाजी खाल्ली तर त्याच्या फॅटी गुणधर्मामुळे त्वचा तरूण दिसेल.


फोलिक ॲसिड :-

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास फोलिक ॲसिड हे सुद्धा राजगिऱ्यामध्ये जास्त प्रमाणात असते.


बीटा कॅरोटीन :-

आपल्या शरीरासाठी प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटामिन ची आवश्यकता असते, तसेच बीटा कॅरोटीन या पोषक तत्त्वाची आवश्यकता असते.


उन्हाळ्यात काहींना डोळ्यांची जळजळ होण्याचा त्रास होत असतो, लहान वयात चष्मा लागतो, त्वचेच्या समस्या जसे सुरकुत्या, डाग पडणे, उन्हात फिरण्यामुळे होणारं टॅनिंग या सर्व समस्या बीटा कॅरोटीनच्या कमतरतेमुळे होतं. राजगिऱ्यात चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे, तर नक्की वापर करा.


लोह आणि कॅल्शियम :-

हाडांच्या मजबूती साठी आवश्यक असतं लोह आणि कॅल्शियम. राजगिरा हे लोह आणि कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. पन्नाशी ओलांडली की आपण कॅल्शियम सप्लीमेंटस् घेतो, त्या ऐवजी राजगिरा भाजी भोजनात असु द्या. नो साईड इफेक्ट्स. 


मॅग्नेशियम :-

मायग्रेनचा त्रास असेल तर राजगिऱ्यात अधिक प्रमाणात उपलब्ध असलेल्या मॅग्नेशियममुळे नक्कीच फायदा होईल.


विटामिन 'ए' :-

राजगिऱ्याचा आहारात वापर केल्यास 'अ' जीवनसत्त्वाची कमतरता भरून येण्यास मदत होते. 


विटामिन 'बी' :- 

राजगिऱ्यात 'बी' जीवनसत्त्व भरपुर मात्रेत असतं, त्यामुळे त्वचा, केस, हिरड्याच्या विकारात यासाठी हितकारक आहे. आजकाल केस गळण्याची समस्या जास्त ऐकण्यात येते. त्वचेची काळजी घेण्यासाठी तरूण मंडळींनी आवर्जून खावी.


ग्लुटेन फ्री :-

राजगिरा ग्लुटेन फ्री असून सेलिएक (Celiac Disease) ह्या पोटाच्या विकारावर त्याचे सेवन उपयुक्त ठरते. राजगिऱ्यात फायबर असल्याने, वाढणारं वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते.


या सर्वगुणसंपन्न राजगिऱ्याला आपल्या  जेवणाच्या पानात मान तर मिळायलाच हवा, नाही का ? राजगिऱ्याच्या पानांची भाजी बनवावी. भाजी मुलं खात नसतील तर पराठ्यामध्ये घालून मस्त चवदार बनवले तर मुलं आवडीने खातात. तसेच राजगिरा हा लाडू,  शिरा, खीर अशा अनेक स्वरूपात बनवता येतो. रक्तदोष, मूळव्याध व लघवीची जळजळ या विकारांवर देखील राजगिरा उपयोगी आहे. मधुमेहींनी तर आपल्या न्याहारीत राजगिऱ्याचं थालिपीठ, लाह्या, भाकरी असा मेनू ठेवावा.


राजगिऱ्याची लागवड आफ्रिका आणि आशिया खंडात केली जाते. ही वनस्पती वाढली की त्यावर कणसासारखे दिसणारे लांब तुरे येतात. हे तुरे वाळल्यावर त्यातून जे बी काढले जाते त्यालाच आपण ‘राजगिरा’ म्हणतो.   राजगिऱ्याच्या वनस्पतीमध्ये दोन प्रकार असतात. एका वनस्पतीला लाल रंगाचे देठ आणि पाने सुद्धा लाल रंगाची असतात, तर दुसऱ्या वनस्पतीला हिरवा रंगाचे देठ आणि त्याची पाने हिरवी असतात. लाल पाने असणाऱ्या वनस्पती ‘लाल माठ’ म्हणून ओळखली जातात, तर हिरव्या पानांची वनस्पती ‘हिरवा माठ’ किंवा ‘राजगिरा’ म्हणून ओळखली जाते. या पाल्याची आणि जाड देठांची भाजी केली जाते. 


हिवाळा जवळ आला आहे. तर हिवाळ्यात मेथी, मोहरी, चाकवत या सोबत वर्णी लागते राजगिरा या पालेभाजीची. उपवासालाच नाही तर आपल्या रोजच्या जेवणात अवश्य खायला हवी. थंडीत गरम गरम बाजरी, मका या उष्ण गुणधर्मांच्या भाकरीसोबत या पालेभाज्यांच्या पातळ भाज्या चविष्ट लागते. त्याची रेसिपी सुद्धा सोपी आहे. पाच मिनिटांत बनणाऱ्या मॅगी सारखी. पण ही भाजी हायजेनिक आहे, बरं का ?



साहित्य :-

राजगिऱ्याची १ जुडी, पाने तोडून स्वच्छ धुवून-  चिरून घ्या,

४-५ लसूण पाकळ्या (उपवासासाठी वगळणे),

मीठ चवीनुसार, तेल, हिरवी मिरची

जिरे, मोहरी - वगळण्यास हरकत नाही



लोखंडी कढईत तेल तापवून घ्यावे. त्यामध्ये जिरे/मोहरी, हिंग घालावे, लसुण खमंग होऊ द्या, मग हिरव्या मिरच्या. चिरलेली भाजी घालून मीठ घालावे. 

गॅस कमी करुन कढई २-३ मिनीटे झाकून ठेवावी. थोड्यावेळाने भाजी नीट मिसळावी. गरम गरम भाकरी सोबत ही भाजी म्हणजे स्वर्गसुख!


आपल्या घरातील बच्चे मंडळी आणि घरी येणारे छोटे छोटे मुलं यांना चॉकलेट, बिस्किटे देण्याऐवजी राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की द्यावी. आजकाल वजन कमी करण्यासाठी ओट्स किंवा कॉर्नफ्लेक्सचे फॅड आहे, पण राजगिऱ्याच्या लाह्या वापरून तर पहा.


हॅलो फ्रेंड्स,  हा राजगिरा बद्दल चा लेख तुम्हाला कसा वाटला, ते नक्की कमेंट करा आणि आवडल्यास नक्की इतरांना शेयर करायला विसरु नका. कारण, उपयुक्त राजगीरा भाजीची सर्वांना माहीती असणं आवश्यक आहे, नाही का ? 


अजून दुसऱ्या भाजीची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी कनेक्टेड रहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने